निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्याचे आदेश !
जिल्हाधिकाऱ्यांचे फर्मान; पुन्हा तपासणी करण्याची होतेय मागणी
श्रद्धा जोशी.
निरा, ता. २४:

जवळपास अवघे शतकभर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आपल्या मस्तकावरून मार्ग देणारा वाटाड्या लवकरच निष्कासित केला जाणार आहे. निरा (ता. पुरंदर) येथील निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल धोकादायक असल्याने तो पाडण्याचे आदेश देण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या वृत्तानंतर निरा व पंचक्रोशीतील नागरिक प्रशासनाच्या या निर्णयावर मूक नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक नेटकऱ्यांनी पुलाचा फोटो व्हाटस् अप स्टेटसला देखील लावलेला दिसून आला.
आषाढी पालखी पायी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वारीपूर्वी पालखी मार्गावरील विविध कामे पूर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, आळंदी देवस्थानचे प्रमुख पदाधिकारी तसेच अधिकारी यांची संयुक्त बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. त्यावेळी निरा येथील पूल पाडण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.
स्थानिक माहितीनुसार पुलाचे बांधकाम इ.स. १९२७ मध्ये करण्यात आले. त्यावेळीचे अभियंता कृष्णा मांडके यांच्या पुढाकाराने हा पूल बांधण्यात आला. गेली ९९ वर्षे हा पूल निरेसह पंचक्रोशीतील नागरिकांची अस्मिता आहे. अनेकदा पूरपरिस्थिती निर्माण झाली व हजारो क्युसेक्सचा प्रवाह या पुलाने अनुभवला. अनेकदा हा पूल कित्येक दिवसांसाठी पाण्याखालीदेखील गेला. पुलाच्या वरील भागाची साधी पडझड वगळता अन्य मोठे नुकसान कधीही झाले नाही. परंतु अचानक आता पूलच पाडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट झाले असल्याचे समजत आहे. वास्तविक आजरोजी पुलाचे वरवर निरीक्षण करता खालील बांधकाम अजूनही सुस्थितीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुलाची कोणतीही पडझड झालेली नसताना पूल धोकादायक कसा ठरविण्यात आला ? यावर अनेक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. दुसरीकडे या पुलाच्या पलीकडील बाजूला बांधलेला रेल्वेपूल आजही सुस्थितीत असून वापरात असताना त्यानंतर पंचवीस, तीस वर्षांनी बांधलेला पूल धोकादायक कसा ठरू शकतो असाही प्रश्न आता ग्रामस्थ करत आहेत.
या पुलावरून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा निरा स्नानासाठी मार्गस्थ होत असतो. त्यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करतो. या पुलाची निर्मिती पालखी सोहळ्याच्या प्रमुख हेतूने करण्यात आल्याचे बोलले जाते. नवीन पुलावरून पालखी सोहळा निरा स्नानाला घेऊन जाताना जिकीरीचे होणारे असल्याचे मतही अनेकांनी मांडले.
दरम्यान, वास्तू धोकादायक झाल्यास ती निर्लेखित करण्याशिवाय पर्याय नसतो. ते नियमोचीतदेखील आहे. परंतु, सदर पुल पाडण्याची खरच गरज आहे का ? ऐतिहासिक वास्तू म्हणून पुलाचा वारसा जपता येईल का ? पुलाची दुरुस्ती करून संवर्धन करता येईल का ? याबाबत प्रशासन, नागरिक यांच्या भूमिका आगामी काळात महत्वाच्या ठरणार आहेत.
त्यापेक्षा पुलाचे संवर्धन करा –
ब्रिटीशकालीन पूल पाडून टाकण्यापेक्षा त्याची दुरुस्ती करावी, पुन्हा एकदा त्रयस्थ संस्थेमार्फत पुलाचे परीक्षण करण्यात यावे, पूल पाडण्याऐवजी तो ठेवा म्हणून जतन केला जावा अशा विविध मागण्या आता नागरिक करत असून पुल वाचावा यासाठी धडपड होताना पाहायला मिळत आहे.

