लोणी भापकर ग्रामस्थांचा कडकडीत बंद; न्यायासाठी जनतेचा एल्गार
जनक्षोभाची ठिणगी पेटली, बारामतीकर आक्रमक
राहुल शिंदे
निरा ता. २२ –
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर त्यांच्या मृत्यूबाबत सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी, या मागणीने आता सामाजिक आणि राजकीय पातळीवर जोर धरला असून बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे ग्रामस्थांनी एकदिवसीय कडकडीत बंद पाळत तीव्र आंदोलन छेडले आहे.
हे आंदोलन म्हणजे “सत्य आणि न्यायासाठीचा लोकशाही मार्गाने दिलेला इशारा” असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले . या आंदोलनाच्या माध्यमातून अजित पवार यांच्या मृत्यूनंतर जनक्षोभाची ठिणगी बारामतीतून पेटली असून जनतेच्या मनात अपघाताविषयी मोठा संशय असून लोक आता संतप्त होताना पाहायला मिळत आहेत.
२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा धक्का बसला होता. मात्र अपघाताबाबत स्पष्ट माहिती समोर न आल्याने संशयाचे वातावरण कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी चौकशीची मागणी केल्यानंतर आता बारामती परिसरातील विविध गावांमधूनही आवाज उठू लागला आहे. लोणी भापकर गावाने गावबंद आंदोलन करून या मागणीला संघटित स्वरूप दिले.
अधिकृत यंत्रणांनी अपघाताचा प्राथमिक निष्कर्ष मांडला असला तरी अनेक प्रश्न अनुत्तरित असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “ही घटना केवळ अपघात नसून घातपात असू शकतो,” असा संशय आंदोलनकर्त्यांनी व्यक्त करत स्वतंत्र आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. स्थानिक तपासावर विश्वास नसल्याने केंद्र सरकार आणि राष्ट्रपती स्तरावर चौकशी व्हावी, अशी भूमिका आंदोलनातून मांडण्यात आली.
विमान अपघातातील ‘ब्लॅक बॉक्स’मधील फ्लाइट रेकॉर्डिंग तातडीने सार्वजनिक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. अपघाताच्या दिवशी अजित पवार शासकीय निवासस्थानातून निघाल्यापासूनच्या सर्व सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ आणि छायाचित्रे जाहीर का केली जात नाहीत? असा सवालही उपस्थित करण्यात आला. पारदर्शकतेचा अभाव असल्याने संशय वाढत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. लोणी भापकरच्या सरपंच गीतांजली भापकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले.
ज्या खासगी कंपनीच्या विमानातून प्रवास सुरू होता, त्या कंपनीच्या व्यवस्थापनावर अद्याप कठोर कारवाई का झाली नाही, हा आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरला. संबंधित कंपनीच्या मालकाला चौकशीअंती तातडीने अटक करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. “जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला.
लोणी भापकरसह आसपासच्या पंचक्रोशीतील व्यापारी, नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. गावातील सर्व व्यवहार स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आले. “अजित दादा अमर रहे” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला. आंदोलनात भावनिक वातावरणासोबतच न्याय मिळवण्याची भूमिका स्पष्टपणे दिसून आली.
येथील ग्रामस्थांनी उपस्थित केलेले प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनले आहेत. हा अपघात नेमका कसा घडला? तांत्रिक कारणे की मानवी हस्तक्षेप? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे — सत्य जनतेसमोर कधी येणार? न्यायाच्या मागणीसाठी सुरू झालेला हा आवाज पुढील काळात राज्याच्या राजकारणात नवे वळण देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एका प्रभावी आणि जनाधार असलेल्या नेत्याच्या अचानक मृत्यूने निर्माण झालेले प्रश्न आता केवळ राजकीय मर्यादेत राहिले नसून सामाजिक अस्वस्थतेचे रूप घेत आहेत. जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तपास यंत्रणांनी पारदर्शकता दाखवणे आवश्यक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

