माऊली यावेत गावी म्हणून उभारला निरा नदीपूल !
ब्रिटीशकालीन पुलाची कहाणी ..
श्रद्धा जोशी.
निरा, ता. २४ :

निरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडण्यात येणार आहे ही बातमी समजताच याविषयी आता पंचक्रोशीतील गावागावातून प्रतिक्रिया उमटत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा गावी यावा, आपल्या हातून सेवा घडावी व सर्वांना दर्शन मिळावे यासाठी स्वखर्चाने चक्क भलामोठा पूल बांधणाऱ्या अवलियाच्या दातृत्वाची आणि संतभेटीच्या इच्छेची ही कहाणी ! त्यांच्या नातवाने सांगितली, ‘लोकसंधान’ ने आपल्यापुढे मांडली…
काळ १८०० दरम्यानचा. महाराष्ट्रात इंग्रजी सत्ता हळूहळू दृढ होत चालली होती. इ.स. १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त होऊन इंग्रजांनी सत्ता काबीज केली. सुरुवातीच्या काळात इंग्रजांनी सुधारणांना प्राधान्य दिले. हुशार आणि अनुभवसंपन्न एतद्देषीय लोकांना इंग्रजांनी विविध जबाबदाऱ्या दिल्या. त्यातीलच एक कर्तुत्ववान, अनुभवसंपन्न आणि दानशूर व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णाजी भगवंत मांडके !
वाल्हे (ता. पुरंदर) येथील एक ब्राह्मण कुटुंब. विठ्ठलभक्तीची ओढ आणि वारकरी सांप्रदायाची जवळीक यातून भक्तीचा मळा फुलविणारे हे कुटुंब. कृष्णाजी लहानपणापासून हुशार होते. इंग्रजांच्या आमदानीत त्यांनी अभियंता म्हणून काम स्विकारले. अल्पावधीत त्यांनी नाव कमावले. पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाची इमारत बांधताना त्यांनी स्वतः ते काम पाहिले होते. आजही ती इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे.
त्यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी वारी सोहळा शिरवळमार्गे पुढे जाई. त्यावेळी निरा येथील आजचा ब्रिटीशकालीन पूल नव्हता. त्याऐवजी तेथे दगडाचा बंधारा, (सांकव, तात्पुरता पूल) होता. नदीचे पाणी वाढले की वाहतूक ठप्प होई असा तो काळ.! संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा पावसाळ्यात मार्गस्थ होतो. हा पालखी सोहळा वाल्हे आणि निरा गावी यावा, तेथे विसावावा, माउलींच्या पादुकांचा स्पर्श आपल्या गावांना व्हावा ही कृष्णाजी मांडके यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी सरकार दरबारी आपले म्हणणे मांडले. स्वतः खर्च करून पूल बांधण्याची जबाबदारी उचलली.
त्यावेळी मांडके यांच्या दगडांच्या खाणी होत्या. त्यांच्या सहाय्याने या पंचक्रोशीतील अनेक मजुरांच्या हाताला काम मिळाले होते. त्यांच्या मदतीने मांडके यांनी हा पूल पूर्ण करायचे मनाशी ठरवले. त्यानुसार त्यांनी कामाला सुरुवात केली. बघता, बघता हळूहळू काम पूर्णत्वाला पोहोचले.
त्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा प्रथमच जेजुरी मार्गे वाल्हे गावात आला. तेथून पुढे निरा नदीवर येऊन या पुलावरून पुढे निरास्नानासाठी मार्गस्थ झाला. तेंव्हापासून ही परंपरा आजतागायत सुरु आहे. गेली ९९ वर्षे संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा या पुलावरून निरा स्नानासाठी जात आहे.
दरम्यान, हा पूल धोकादायक असून तो पाडण्यात यावा असे आदेश देण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आणि या पुलाशी निगडीत पंचक्रोशीतील नागरीकांनी प्रशासनाच्या कार्यवाहीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले. हा पूल सरकारने बांधलाच नाही तर मग सरकारला पाडण्याचा काय अधिकार ? असे संतप्त सवालही करण्यात आले आहेत. दरम्यान, याबाबत आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
“माझ्या आजोबांनी हा पूल स्वखर्चातून बांधला आहे. या पुलामुळे पालखी सोहळा आपल्या वाल्हे, निरा या गावातून जाऊ लागला. त्यामुळे माउलींना आपल्याकडे घेऊन येणारा हा पूल ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. आम्ही स्वतः याबाबत दोन दिवसात जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत. याबाबत सर्वजण आमच्या पाठीशी आहेत याचा आम्हाला आभिमान आहे.”
– बाळकृष्ण भालचंद्र मांडके, (कृष्णाजी मांडके यांचे नातू.)

