बापरे! बिबट्या पुढेपुढे चारचाकी मागेमागे!
साकुर्डे घाटात चारचाकीसमोर बिबट्याची एन्ट्री
राहुल शिंदे
नीरा दि. ६
पुरंदर तालुक्यात बिबट्या नजरेत येण्याच्या घटना वाढल्या आहेत. पिंगोरी येथे बिबट्याचे अनेक वर्षापासून वास्तव्य आहे. मात्र आता या भागामध्ये बिबट्यांची संख्या वाढल्याने हे बिबटे आता लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. तीन दिवसांपूर्वी साकुर्डे घाटामध्ये या बिबट्याने चारचाकी समोर ठिय्या मांडला. त्यानंतर सुमारे एक किलोमीटर अंतर तो रस्त्यावरून चालत होता. त्यामुळे बिबट्या पुढेपुढे आणि चारचाकी मागेमागे असे चित्र निर्माण झाले होते.
अचानक समोर आलेल्या या प्रसंगाने गाडीतील प्रवाशांची भीतीने गाळण उडाली. मात्र अशाही परिस्थितीत या तरुणांनी या बिबट्याचा व्हिडिओ काढला असून तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
याबाबत मिळालेल्या माहितीवरून पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील रहिवासी असलेले ओंकार सुतार आणि दर्शन शिंदे हे पिंगोरीहून साकुर्डेकडे आपल्या चारचाकी वाहनातून चालले होते. कवडेवाडीच्या पुढे घाटात गेल्यावर एका वळणावर बिबट्या रस्त्यावर ठाण मांडून बसल्याचे त्यांना दिसून आले. बिबट्याला पाहून दोघांना भीती वाटली. मात्र लगेच सावरत त्यांनी कार थोडी मागे घेतली आणि मोबाईलद्वारे व्हिडिओचित्रण सुरू केले.त्याचवेळी समोरून देखील एक चारचाकी कार आली. त्या चारचाकी गाडीतून माऊली खोमणे आणि यश खोमणे सासवडहून पिंगोरीकडे येत होते. त्यामुळे थोड्या वेळासाठी बिबट्या रस्त्यातून बाजूला झाला. मात्र लगेचच त्याने पुन्हा रस्त्यावर एन्ट्री मारली. जवळपास एक किलोमीटर हा बिबट्या कारच्या समोर चालत होता. मात्र त्यानंतर तो शेजारील झाडीत निघून गेला. मात्र अशाप्रकारे बिबट्या रस्त्यावर बसत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव आता धोक्यात आला आहे. रात्रीच्या वेळी कवडेवाडी-साकुर्डे घाटातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जीव आता धोक्यात आले आहेत. त्यामुळे बिबट्याला पिंजरा लावून पकडून न्यावे अशी मागणी आता ग्रामस्थ करीत आहेत.
“आम्ही नेहमी या रस्त्यावरून प्रवास करतो. इतर वेळेस बिबट्या रस्त्याच्या बाजूला दिसल्याचे ऐकले होते.. मात्र काल बिबट्या रस्त्यावरच ठाण मांडून बसला होता. गाडीचा हॉर्न वाजवला तरी तो बाजूला जात नाही. आम्हाला याचा थरारक अनुभव प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला.”
– ओमकार सुतार (प्रत्यक्षदर्शी)
” पिंगोरी परिसरात एकच नाही तर आठ ते दहा बिबटे आहेत. त्यांची संख्या कधी कमी होते तर कधी जास्त होते. अनेक वेळा शेतकऱ्यांच्या पशुधनांवर बिबट्याचे हल्ले झाले आहेत. मात्र बिबट्या आता रस्त्यावरच ठाण मांडत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी साकुर्डे-कवडेवाडी या घाट मार्गावरून प्रवास करणे दुचाकीस्वारांनी टाळावे”
– राहुल शिंदे पोलिस पाटील

