आत्महत्यांच्या प्रयत्नांचे वाढते प्रमाण चिंताजनक!
श्रद्धा जोशी
————————-
निरा ता. ०४ :
आत्महत्येने संबंधित व्यक्तीचे आयुष्य संपते खरे, परंतु या आयुष्यावर अवलंबून असलेल्या इतरांचे काय ? हा विचार आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींपुढे येत नसेल काय? परंतु तरीही अन्य मार्ग सापडत नसल्याने टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाण वाढत असून हे चिंताजनक आहे.

नीरा (ता. पुरंदर) व परिसरात गेल्या काही वर्षात आत्महत्येच्या प्रयत्नांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. टोकाचे पाऊल उचलण्यात पुरुषांची संख्या वाढत असून अन्य मार्ग न सापडल्याने हा टोकाचा मार्ग निवडला जात असल्याचे दिसून येत आहे.
आत्महत्येपूर्वी मिळालेल्या चिठ्ठ्यांमध्ये अनेकदा गंभीर कारण नसते. कुटुंबीयांच्या प्रतिष्ठेची भीती आणि “लोक काय म्हणतील?” याचा अतिरिक्त विचार या घटनांमागे दिसून येतो.
आयुष्य म्हटले की चढउतार यायचेच! आत्महत्येच्या प्रकरणांमागे समाज काय म्हणेल? आपली प्रतिष्ठा कितपत राहील ? याचा अधिक विचार दिसून येतो. त्यासह विश्वासघात, वाढता कर्जबाजारीपणा, अधिक मद्यपान, प्रेमप्रकरणे, संसारिक मतभेद व इतर अनेक कारणे दिसून येतात. परंतु, वर्षानुवर्षे जपलेला देह काही दिवसांच्या टेन्शनने संपवावा हा मार्ग संबधित व्यक्तीसह त्याच्या कुटुंबियांना दुःखात ढकलतो. एखाद्या अडचणीतून, संकटातून बाहेर पडण्याची खात्री बाळगणे, स्वतःवर विश्वास ठेवणे या धकाधकीच्या काळात अत्यावश्यक बनले आहे. काळमहिमेनुसार जाणारा काळ मलमाचे काम करत असेल तर आत्महत्येचा प्रयत्न करू पाहणाऱ्याने जरूर थांबावे असे वाटते.
एखादी सुसाईड नोट ठेवली की, आत्महत्या करणाऱ्याची जबाबदारी संपली का ? त्याच्या किंवा तिच्या जाण्याने सगळे प्रश्न सुटणार असतील तर ठीक आहे. परंतु आत्महत्या करणारा सगळ्या कुटुंबाचा आधार असेल तर ? मुलाबाळांचे पुढे काय ? आई किंवा वडिल या नात्याचा आधार त्यांना आयुष्यभर मिळेल का ? पत्नीपुढे कोणतेही उत्पन्नाचे साधन नसेल तर? त्याच्या आईवडिलांची तोच म्हातारपणाची काठी असेल तर? याकडे आत्महत्येचा प्रयत्न करू पाहणाऱ्यांनी एकदा सकारात्मक नजरेने पाहण्याची आवश्यकता आहे.
आत्महत्येच्या प्रयत्नाला काही वेळा दुसरा व्यक्ती जबाबदार असतो. पैशांचा व्यवहार, ब्लॅकमेलिंग, संसारिक त्रास, नोकरीतील दबाव, धमक्या, शाळा कॉलेजमधील अधिक टेन्शन, मारहाण, अब्रूनुकसानीची भिती यांमुळे मेटाकुटीला येऊन अनेकजण आत्महत्या करतात. अशा घटना थांबणे आवश्यक असून त्यासाठी जनजागृतीची गरज आहे.
“व्यक्त व्हायला हवे. पुरुषांच्या वाढत्या आत्महत्या प्रयत्नांचे प्रमाण हे अधिक धोकादायक चित्र आहे. कुटुंब, समाज, संसार, नोकरी, व्यवसाय यांचा सगळा भार वाहणारा पुरुष कधी खचतो तेच कळत नाही. वडिल, मुलगा, भाऊ, नवरा म्हणून पुरुषांना समजून घेण्याची गरज आहे. त्यांच्या जगण्याच्या आणि जगविण्याच्या संघर्षाला आधार देण्याची गरज आहे.”
– डॉ. दिनकर गायकवाड, निरा

