पुरंदरमध्ये भाजपाची ‘स्वबळावर’ जोरदार खेळी
प्रभावी उमेदवारांना संधी देण्याचा पक्षाचा प्रयत्न
श्रद्धा जोशी.
निरा, ता. २१ :
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेच्या युतीच्या चर्चांना विराम मिळाल्यावर एकीकडे भाजप–शिवसेना युती फिस्कटल्याचे दिसून येत आहे. भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्धार यापूर्वीच केला होता. त्यातच ऐनवेळी काही दिग्गजांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवल्याने भाजपची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद गट व आठ पंचायत समिती गणांसाठी सक्षम उमेदवारांची घोषणा झाल्याने पुरंदरमधील निवडणूक प्रचाराला चांगलाच वेग आला आहे.
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांपूर्वी सुरू असलेली भाजप–शिवसेना युतीची चर्चा अखेर निष्फळ ठरली. शिवसेनेसोबत युतीचा प्रस्ताव माजी आमदार संजय जगताप यांनी स्पष्टपणे नाकारल्यानंतर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलली. युतीच्या नावाखाली अटी-शर्ती मान्य नसल्याने भाजपने सर्व प्रस्ताव फेटाळत ‘स्वबळावर निवडणूक’ लढवण्याची ठाम भूमिका घेतली.
भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीमुळे तालुक्यातील प्रत्येक गट व गणात राजकीय हालचालींना वेग आला असून प्रचार रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, भाजपची उमेदवार यादी पुढीलप्रमाणे –
जिल्हा परिषद गट
▪ बेलसर – अजय इंगळे
▪ वीर-भिवडी – हरिभाऊ लोळे
▪ दिवे-गराडे – दिव्या जगदाळे
▪ निरा-कोळविहीरे – सिमा संदीप धायगुडे
पंचायत समिती गण
▪ बेलसर – कैलास जगताप
▪ माळशिरस – माऊली यादव
▪ वीर – सुधीर धुमाळ
▪ भिवडी – अश्विनी शिंदे
▪ दिवे – सुनिल कुंजीर
▪ गराडे – ललिता कटके
▪ निरा-वाल्हे – वंदना बाळासाहेब भोसले
▪ कोळविहीरे – सिमा भाग्यवान म्हस्के
स्थानिक पातळीवर प्रभाव असलेले, अनुभवी व मतदारांमध्ये पकड असलेले उमेदवार मैदानात उतरवल्याने भाजपने सुरुवातीलाच आघाडी घेतल्याचे चित्र आहे. युती फिस्कटल्यामुळे आता निवडणूक थेट बहुरंगी आणि चुरशीची होणार असून, भाजपच्या या घोषणेमुळे इतर पक्षांनाही रणनीती बदलावी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पुरंदरच्या राजकारणात या घडामोडींमुळे आगामी निवडणूक प्रतिष्ठेची आणि ताकदीची लढाई ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

