पुरंदरमध्ये विशाल नरवाडे यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती
आज नोडल अधिकाऱ्यांची झाली बैठक
श्रद्धा जोशी
निरा ता. २३ –
पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी विशाल नरवाडे (भा.प्र.से.) यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर पुरंदरच्या निवडणूक निर्णय अधिकारी व उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे यांच्या उपस्थितीत सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारतीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
राज्य निवडणूक आयुक्तांच्या १३ जानेवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेनुसार पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट व पंचायत समितीचे आठ गण यांच्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.
बैठकीत निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच निवडणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.
निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व मतदान केंद्रांचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर लाईट, पाणी, स्वच्छतागृह, बैठक व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत की नाहीत याची खातरजमा करण्यास सांगण्यात आले आहे.
सर्व नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना राज्य निवडणूक आयुक्तांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व सुरळीतपणे पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, निवडणूक कालावधीत नागरिकांच्या तक्रारी, शंका, हरकती अथवा अडचणी नोंदविण्यासाठी सासवड येथील नवीन प्रशासकीय इमारत, दुसरा मजला येथे निवडणूक निरीक्षकांचा स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या ठिकाणी नियुक्त कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणार असून नागरिकांना थेट तक्रारी नोंदविता येणार आहेत अशी माहिती देण्यात आली.

