कोळविहीरे गणात होणार चौरंगी लढत !
सतरा अर्ज मागे; चार उमेदवारांची आपसात लढत
श्रद्धा जोशी.
निरा, ता. ३१ :
पुरंदर तालुक्यातील बहुचर्चित कोळविहीरे गणात आता चौरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे यावेळी गणातून कोणीतीही बंडखोरी झाली नसून एकही अपक्ष उमेदवार रिंगणात नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना अशा मोठ्या पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे लढत चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे.
या गटातून एकूण एकवीस उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. हा गण सर्वसाधारण स्त्री करिता राखीव होता. त्यामुळे या गणातून इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. पक्षीय उमेदवारीसाठी अनेकजण इच्छुक होते. मुलाखतीसाठीदेखील अनेक इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली होती. यावेळी सतरा अपक्ष अर्ज दाखल होते. काही उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले होते. आता सतरा अर्ज माघारी घेण्यात आले असून चारच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे गणातील लढतीचे अंतिम चित्र आता स्पष्ट झाले आहे.
निवडणूक जाहीर झाल्यापासून अनेक घडामोडी या गणात घडल्या. निष्ठावान आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी डावलण्यात आल्याचे म्हणणे अनेकांनी व्यक्त केले होते. चिन्हवाटप पार पडले असून कोळविहीरे गणात या उमेदवारात चौरंगी लढत रंगणार आहे. दरम्यान, जनता कुणाला कौल देते हे पाहणे आगामी काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.

