निरेतील शहा कन्या विद्यालयामध्ये रंगले वार्षिक स्नेहसंमेलन
श्रद्धा जोशी.
निरा, ता. २५ :
निरा (ता. पुरंदर) येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. लिलावती रिखवलाल शहा कन्या विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री व सौ बंडू पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे तसेच लक्ष्मण चव्हाण, चित्रा शहा, रेणुका कोठडीया, तनुजा शहा, संतोष गांधी, अनिल चव्हाण, योगिता चव्हाण, रेखा चव्हाण, रामदास राऊत, श्री व सौ. पाटोळे, मोहम्मदगौस आतार, पांडुरंग पोटे, विकास जाधव आणि भोसले प्रतिष्ठानचे प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने यांनी केले. त्यानंतर विविध विषयांवर आधारित कार्यक्रमांचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. त्यामध्ये शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे शेतकरी नृत्य, देशभक्तीपर ऑपरेशन सिंदूर, शैक्षणिक नाटिका तसेच दमलेल्या बाबाची कहाणी, शिवरायांचे पोवाडे, आईचा गोंधळ अशा परंपरागत नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले . त्यानंतर मागील वर्षी आणि यावर्षी शाळेतील भौतिक सुविधांमध्ये योगदान देणाऱ्या देणगीदार संजय उरमोडे, भोसले प्रतिष्ठान, रामदास राऊत यांचा सत्कार घेण्यात आला .

चांगल्या कामगिरीसाठी विद्यालयातील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका निर्मला माने (शाखा दीपस्तंभ ), अनुराधा उरमोडे (आदर्श पर्यवेक्षक ), अनिल कांबळे ( आदर्श शिक्षक ), माया गायकवाड (आदर्श शिक्षिका व प्रसिद्धीचा आधारस्तंभ), भास्कर लोमटे (उपक्रमशील शिक्षक ), कुणाल खैरकार (तंत्रस्नेही शिक्षक), किरण शेटे (शाळा सहकार्यतत्पर व्यक्ती), अश्विनी सावंत (उत्कृष्ट गुरुकुल प्रमुख), मंगल चव्हाण (आदर्श माता ), अश्विनी खोपे (उत्कृष्ट गर्ल गाईड प्रमुख) यांना गौरविण्यात आले.
गतवर्षी शंभर टक्के निकाल असलेले दहावीचे विषय शिक्षक राजश्री चव्हाण, ज्ञानेश्वर जाधव, वैशाली निगडे यांचाही सन्मान करण्यात आला. सारा शहा (आदर्श विद्यार्थिनी ), सांची बनसोडे ( आदर्श वक्ता), बिझनेस गर्ल ऑफ द इयर पाचवी व त्यांच्या वर्गशिक्षिका शिवाई मधे, आदर्श परिपाठ छोट्या गटांमध्ये सातवी अ (वर्गशिक्षक माया गायकवाड ), मोठ्या गटांमध्ये नववी अ (वर्गशिक्षक शितल फरगडे ) याप्रमाणे शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला.
त्यानंतर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी सांची प्रधान व शिष्यवृत्ती विभाग प्रमुख मयुरी भिसे तसेच रयत प्रज्ञाशोध शिष्यवृत्तीधारक सारा शहा, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख मंगल चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वर्षभरामध्ये विद्यालयामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व उपक्रम यामध्ये विशेष कार्य करणाऱ्या सुमारे सातशे विद्यार्थीनींना प्रमाणपत्र, ट्रॉफी व मेडल याचे वाटप करण्यात आले.


