सीमेवर सैनिकांचा पहारा, गावात लोकशाहीसाठी ग्रामस्थांचा लढा
मतदानासाठी पैसा न घेण्याचा पिंगोरी ग्रामस्थांचा ऐतिहासिक निर्णय
राहुल शिंदे
निरा ता. २७ :
“तुम्ही देशासाठी सीमेवर लढा, आम्ही लोकशाहीच्या रक्षणासाठी गावात लढा देऊ” या ठाम भूमिकेसह पुरंदर तालुक्यातील पिंगोरी गावाने लोकशाहीसाठी एक आदर्शवत निर्णय घेतला आहे. देशातील कोणत्याही निवडणुकीत मतदानासाठी एकही पैसा किंवा कोणतेही आमिष स्वीकारायचे नाही, असा निर्णय पिंगोरी ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी सर्वानुमते घेतला आहे.
पिंगोरी गाव ‘सैनिकांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. शिंदे सरदारांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या गावातील दोन जवानांनी देशसेवेत बलिदान दिले आहे, तर अनेक जवान सध्या सीमेवर सेवा बजावत आहेत. अशा गावाने लोकशाहीच्या रक्षणासाठी घेतलेला हा निर्णय संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे.
स्वागत कमानीच्या कामाचा शुभारंभ
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय सैन्यात शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि सेवेत असलेल्या सैनिकांचा गौरव वाढवण्यासाठी गावाच्या वेशीवर उभारण्यात येणाऱ्या स्वागत कमानीच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. सेवानिवृत्त सैनिकांच्या हस्ते, तसेच वीरपत्नी नंदा रमेश शिंदे व वीरपत्नी छाया शंकर शिंदे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ पार पडला. यावेळी गावातील अनेक माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकशाही विकली जाते, हे थांबवायला हवे – सैनिकांची भावना
यानंतर महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर सखोल चर्चा झाली.
“आम्ही सीमेवर देशाचे रक्षण करतो, पण पैसे घेऊन मतदान झालं तर देश चुकीच्या लोकांच्या हातात जातो. चांगले लोक निवडून यायचे असतील तर निवडणुकीतील पैशांचा बाजार बंद झाला पाहिजे. तेव्हाच लोकशाही टिकेल,” अशी स्पष्ट भावना सैनिकांनी व्यक्त केली. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील आर्थिक देवाण-घेवाणीवरही चर्चा झाली. अखेर यापुढे कोणत्याही निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराकडून पैसा, जेवणावळ, मटन पार्टी किंवा अन्य प्रलोभने स्वीकारायची नाहीत, असा ठाम निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
पुढे बोलताना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की, “सैनिक जर सीमेवर देशाचे रक्षण करत असतील, तर आपण सर्वजण मिळून आपल्या गावातून लोकशाहीचे रक्षण करूया,”. या निर्णयाला सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला.या वेळी सरपंच संदीप यादव, उपसरपंच भाग्यश्री शिंदे,पोलिस पाटील राहुल शिंदे माजी सरपंच जीवन शिंदे, प्रकाश शिंदे, निलेश शिंदे, धनंजय शिंदे, दत्तात्रय शिंदे, दिनेश भोसले, माजी सैनिक रामदास शिंदे, मंगेश शिंदे, विशाल गायकवाड, लक्ष्मण कदम, अजय शिंदे, रणजीत शिंदे, सचिन शिंदे, तेजस शिंदे, अमोल शिंदे, माजी उपसरपंच हरिश्चंद्र यादव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“पूर्वी पैशांच्या जोरावर निवडणुका होत नव्हत्या. आता गुन्हेगारही निवडून येतात. गावाने घेतलेला हा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे.”
– हरिश्चंद्र यादव (माजी सरपंच, पिंगोरी)
हा निर्णय आम्हाला १०० टक्के मान्य आहे. आम्ही स्वतः मतदान करू आणि इतरांनाही जागरूक करू. आमचं मत आम्ही विकणार नाही.”
– सतीश शिंदे (स्थानिक ग्रामस्थ)
लोकशाहीसाठी आदर्श पाऊल –
पिंगोरी ग्रामस्थांनी घेतलेला हा निर्णय लोकशाही बळकट करणारा असून इतर गावांसाठीही तो प्रेरणादायी ठरणार आहे. ‘मतदान विक्रीला नाही’ हा संदेश देत पिंगोरीने लोकशाहीच्या रक्षणासाठी एक नवा आदर्श घालून दिला आहे.

