सुनील लोणकरांना ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार
श्रद्धा जोशी
निरा ता. ०८ :
ग्रामीण मातीशी जोडलेली नाळ कायम ठेवणारे तसेच कार्यक्षेत्रातील लोकांच्या सुख दुःखात सामील होणारे पुरंदर तालुक्यातील पत्रकार सुनील लोणकर यांना नुकताच ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, साहित्य, वैद्यकीय, प्रशासकीय क्षेत्रातील अनेक कर्मचारी, मान्यवरांनी लोणकर यांचे अभिनंदन केले.
पुण्यातील पर्वती येथे राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले सभागृहात आयोजित कार्यक्रमामध्ये शिक्षक शिक्षकेतर संघटनेतर्फे ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्काराने पत्रकार सुनील लोणकर यांचा गौरव करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. शिक्षक असतानाही सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून समाजकल्याणाचे कार्य उराशी बाळगणाऱ्या लोणकरांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.
सुनील लोणकर यांनी आजवर शाळा व शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने मांडले आहेत. तसेच शासकीय योजना, अतिक्रमण, विविध संघटनांची कार्ये यांबाबत विशेष वृत्तलेखन केले आहे. शिक्षक तसेच शिक्षकेतर संघटनांचे प्रश्न, समस्या हिरिरीने मांडल्या. अनेक समाजोपयोगी कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांनी सामाजिक कल्याण साधण्यासाठी सहभाग नोंदविला. या सर्वांची आठवण यानिमित्ताने अनेकांनी व्यक्त केली. यावेळी शिवाजीराव खांडेकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
“एक कार्यतत्पर शिक्षक म्हणून माझी सेवा मी बजावत आहेच. शिक्षकाचे काम केवळ अध्यापन करणे नसून समाजसेवा हे त्याचे दुसरे अंग आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून मी पहिल्या अंगाची सेवा करत करत दुसऱ्या अंगाची कास धरली. अयोग्यावर प्रहार करण्याची शिकवण मला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या साहित्यातून मिळाली तर चांगल्या कार्याची पाठराखण करणे मी संत रामदास स्वामींच्या शिकवणुकीतून शिकलो. आज मला मिळालेल्या पुरस्काराने मला भरून पावले.”
– सुनील लोणकर, जिल्हाध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद, मुंबई

