स्वामी विवेकानंद ; व्यक्ती एक पैलू अनेक !
प्रसिद्ध लेखक प्रा.कुंडलिक शांताराम कदम यांचा लेख
श्रद्धा जोशी
निरा,ता. १२ :
स्वामी विवेकानंद यांचे अभ्यासक, संशोधक, लेखक आणि व्याख्याते प्रा. कुंडलिक कदम यांनी लिहिलेला लेख ‘लोकसंधान’ मार्फत प्रसिद्ध करीत आहोत.

इ. स. १८९३ मधील सप्टेंबर महिन्यातील अकरा तारीख. अमेरीका येथील शिकागो येथील धर्मपरिषद भरली होती. जगभरातून अनेक धर्माचे प्रतिनिधित्व करणारे लोक त्या धर्मपरिषदेला हजर होते. भारतामधून तेजस्वीमुद्रा आणि भगवा पायघोळ झगा घातलेला एक संन्यासी सर्वधर्मपरिषदेसाठी उपस्थित होता. त्याचे नाव पुकारल्यावर तो आपल्या भाषणासाठी उभा राहिला आणि तो सन्यासी म्हणाला, “माझ्या अमेरीकेतील भगिनींनो आणि बंधुनो” ( Sisters and Brother’s Of America ), असे शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडल्यानंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. जगाच्या व्यासपीठावर प्रथमच विश्वबंधुत्वाची कल्पना त्यांनी जगासमोर मांडली. त्यानंतर त्यांनी भाषणातून हिंदू धर्मातील सहिष्णूता आणि स्विकारशीलता या दोन तत्वांविषयी भूमिका त्या व्यासपीठावर मांडली. त्यांचे भाषण संपल्यानंतर प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. असंख्य श्रोते जागेवरून उठले आणि त्यांनी व्यासपीठाकडे धाव घेतली. सर्वधर्मपरिषदेतील सर्वात लोकप्रिय तेजस्वी संन्यासी होते ; भारताचे सुपुत्र स्वामी विवेकानंद !
स्वामी विवेकानंदाच्या जीवन प्रवासाचा विचार करता त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग, विचार आपणासमोर मार्गदर्शक आहेत. स्वामी विवेकानंद आणि हिंदूधर्म हा केवळ एकच विचार समाजामध्ये जाणीवपूर्वक रुजवल्याचे दिसून येते. स्वामी विवेकानंद आणि त्यांचे जीवनचरित्र अभ्यासताना दिसून येते की, स्वामीजींनी हिंदू धर्मातील चांगल्या गोष्टींचा गौरव केला तर वाईट प्रथांवर जोरदार टिका केली आहे.

LLB व १२ वी नंतरच्या MHT – CET चे फॉर्म भरले जातील. संपर्क – ९९६०४९७५२२
सर्व धर्मांचा आदर करून प्रत्येक धर्मातील चांगल्या बाबींचा स्विकार केला आहे. भौतिकता आणि अध्यात्मिकता यांचा समन्वय साधण्याचे काम स्वामीजींनी केले आहे. विज्ञानाच्या माध्यमातून पाश्चात्य देश समृद्ध झाले. त्या विचारांचे बीज भारताच्या भूमीत रूजावे आणि भारताच्या अध्यात्मिक विचारांचा प्रसार पाश्चात्य देशात व्हावा यासाठी स्वामीजींनी प्रयत्न केले. स्वामीजी धर्माचे प्रसारक तर होते, त्याचबरोबर धर्माचे चिकित्सक पण होते. त्यांच्या विचारात वेगळेपण होते. स्वामीजींचा युवा पिढीवर विश्वास होता. भारताच्या परिवर्तनामध्ये युवकांची भूमिका महत्वाची होती. युवकांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी विशेष लक्ष्य केंद्रित केले. स्वामीजींचे विचार आणि जीवनातील प्रसंग आपणाला काहीतरी संदेश देऊन जातात. रविंद्रनाथ टागोर म्हणतात, “भारताला जाणून घ्यायचे असेल तर विवेकानंद वाचा, त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास करा. तेथे सारे सकारात्मक आहे.”
निर्भयवृत्ती :
स्वामी विवेकानंद हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत. भारतीय जनतेची वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी सर्व भारतभर भ्रमण केले. भारतीय युवकांची दयनीय अवस्था बघून ते म्हणाले, ” माझ्या तरुण मित्रांनो सामर्थ्यसंपन्न व्हा; हाच माझा तुम्हाला उपदेश आहे. गीतेच्या अध्ययनापेक्षा फुटबॉल खेळून तुम्ही स्वर्गाच्या अधिक निकट जाऊ शकाल. तुमचे शरीर चांगले सदृढ झाल्यावर गीता तुम्हाला अधिक चांगली कळेल. तुमच्या शरीरातील रक्त थोडे शक्तिशाली झाले म्हणजे भगवान श्रीकृष्णांची अलौकिक प्रतिभा व अपार सामर्थ्यांचे तुम्हाला अधिक चांगले आकलन होईल.” स्वामीजी म्हणतात, ” प्रत्येक व्यक्तीला निर्भय होण्याचा संदेश वेदान्त देतो. सामर्थ्य हे पुण्य आहे. दुर्बलता हे पाप आहे. एखाद्या बांब गोळ्याप्रमाणे अज्ञानराशीवर आदळणारा उपनिषदांतील शब्द आहे. ‘ अभी ‘ निर्भयता, म्हणजे आध्यात्मिक सामर्थ्य. कशाचेही भय बाळगू नका तरच तुमच्या हातून पूर्ण कार्य होऊ शकेल. ज्याक्षणी तुम्ही भयभीत व्हाल त्याक्षणी तुमची शक्ती नष्ट होऊन दुर्गती सुरू होईल. म्हणून उठा. जागे व्हा व ध्येय प्राप्त केल्याविना थांबू नका. Awake, Arise and stop not till the acheives.”
मित्रमंडळात नरेंद्र सर्वांचा आवडता असे. कारण कोणत्याही अडचणीमध्ये तो मदतीसाठी पुढे येत असे. हरिदास चट्टोपाध्याय हा गरीब महाविद्यालयीन विद्यार्थी होता. परीक्षा जवळ आली तरी त्याला महाविद्यालयाचे शुल्क भरता आले नाही. गरीब विद्यार्थ्यांसाठी फीमध्ये संपूर्ण माफी मिळण्याची सवलत संस्थेत होती. याबाबतीत ज्येष्ठ लेखनिक राजकुमार निर्णय घेई. नरेंद्र त्यांच्याकडे गेला व त्याने सवलत मिळविण्यासाठी विनवणी केली. परंतु तो लेखनिक म्हणाला, “तू त्याची तरफदारी करू नकोस. मला ऐकण्याची इच्छा नाही.” हरिदास निराश झाला. पण नरेंद्राने त्याला धीर दिला. राजकुमार या लेखनिकाला अफूपासून तयार होणाऱ्या पदार्थांचे व्यसन होते. संध्याकाळी कोणाला न कळत तो अड्ड्यांवर जात असे. नरेंद्र अंधार पडताना आधीच त्या अड्ड्यांवर जाऊन उभा राहिला .
तू इथे कसा? गोंधळून जाऊन त्याने नरेंद्राला विचारले, नरेंद्राने सरळ हरिदासचा विषय काढला. “त्याला पूर्ण सवलत द्या, नाहीतर मी तुमच्या व्यसनाचा सगळीकडे बोभाटा करेन !” अशा वेळी राजकुमारने मुकाट्याने वादात न शिरता फीमधील सवलतीची हमी दिली. फक्त परीक्षा शुल्क मात्र त्याने भरावे असे सांगितले. दुसऱ्या दिवशी हरिदासच्या घरी जावून नरेंद्राने ही आनंदाची बातमी त्याला सांगितली. त्यानुसार परीक्षा शुल्काची व्यवस्था झाली व हरिदासाला वर्ष गमवावे लागले नाही. परिस्थितीमध्ये हिकमतीने मार्ग काढण्याचे एक चातुर्य नरेंद्राच्या ठायी होते.
मनाची एकाग्रता व तीव्र स्मरणशक्ती –
कोणतेही काम करताना मनाची एकाग्रता असेल तर ते काम अधिक चांगल्या प्रकार होते. एकाग्रता हा सर्व प्रकारच्या ज्ञानाचा पाया आहे. तिच्या अभावी काहीच करता येत नाही. स्वामी विवेकानंद मनाच्या एकाग्रतेबाबत म्हणतात, ” जीवनात प्रत्येकाला मनाच्या एकाग्रतेची गरज असते. कोणत्याही कामावर तुमचे मन एकाग्र असले तर ते काम अधिक चांगल्या प्रकारे होते.” एकाग्र मनाच्या बाबतीत स्वामीजी म्हणतात, “एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईट सारखे असते. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची कानाकोपऱ्यातील वस्तूसुद्धा चांगल्या प्रकारे दिसते.” शिकागो धर्मपरिषदेतल्या त्या छोट्याशा संबोधनाने व व्याख्यानाने स्वामीजी सर्व अमेरिकेला, जगाला ज्ञात झाले. अमेरिकेत सर्व वर्तमानपत्रांत स्वामीजींचे फोटो, माहिती प्रसिद्ध झाली. प्रौढांप्रमाणे मुलेही स्वामीजींवर प्रेम करीत. अमेरिकेत असताना एकदा स्वामीजी काही मुलांचे निरीक्षण करीत होते. ती मुले एका पुलावर उभी राहून पाण्यात तरंगणाऱ्या अंड्यांच्या टरफलावर नेम धरून गोळ्या मारीत होती. परंतु ते एकाही अंड्याच्या टरफलाचा वेध घेऊ शकले नाहीत. त्यांनी अनेक वेळा गोळीबार केला पण नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळी त्यांचा नेम चुकत राहिला. स्वामीजी हे सर्व कुतूहलाने पाहत होते. स्वामीजी म्हणाले, मी प्रयत्न करु का? तेव्हा ती मुले म्हणाली, ” हे काम तुम्ही समजता तेवढे सोपे नाही !” स्वामीजींनी बंदूक हातात घेतली व अंड्याच्या टरफलावर नेम धरला. ते थोडा वेळ स्तब्ध व शांत उभे राहिले. वेध घेऊन गोळीबार केला. त्यांनी बारा वेळा गोळ्या झाडल्या आणि प्रत्येक वेळी अंड्याच्या टरफलाला अचूक नेम लागला. सर्व मुले आश्चर्यचकित झाली. अंड्याच्या टरफलाचा वेध घेणे कोणाचाही सराव नसलेल्या माणसाला कसे शक्य आहे? असा विचार मुले करत राहिली. नंतर मुलांनी स्वामीजींना विचारले, ” हे तुम्हाला कसे काय साधले? ” स्वामीजी हसले. त्यांना ती मुले आवडली होती. “तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये तुमचे मन पूर्णपणे घाला, जर तुम्ही नेमबाजी करत आहात तर तुमचे मन त्या निशाणावरच राहू द्या मग तुम्ही त्यात कधीही चूक करणार नाही. जर तुम्ही अभ्यास करीत असाल तर फक्त अभ्यासाचाच विचार करा.

प्रचंड वाचन व जिज्ञासू वृत्ती –
स्वामी विवेकानंदांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अनेक पाश्चिमात्य विचारवंताच्या पुस्तकांचे वाचन केले होत. वाचन केलेल्या पुस्तकाबाबत ते आपल्या शिक्षकांशी चर्चा करत होते. वाचनामुळे त्यांना अनेक प्रश्न पडत होते. वाचनामुळे त्यांच्यामध्ये अनेक गोष्टी जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण होत होती. जीवनातील वाचनाचे महत्व विशद करताना स्वामी विवेकानंद म्हणतात, ” जीवनातील अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे वाचन होय. “बेलुरला गेल्यानंतर आणखी एक मजेदार घटना घडली. मठाकडे ‘ब्रिटानिका’ या विश्वकोशाचे पंचवीस मोठमोठे भाग होते. स्वामीजींनी ते वाचायला सुरुवात केली. मन एकाग्र करण्याची त्यांच्याकडे प्रचंड शक्ती असल्यामुळे त्यांचे वाचन झपाट्याने होई. दहा खंड पूर्ण करून त्यांनी अकरावा वाचण्यास घेतला. त्यावेळी त्यांचा एक शिष्य आला. तो त्या पुस्तकांच्या प्रचंड पसाऱ्याकडे पाहून म्हणाला, “एखाद्याने जन्मभर जरी या खंडांचे वाचन केले तरी ते त्याला समजणे अवघड आहे.” स्वामीजी उत्तरले, ” असे का म्हणतोस? मी दहा खंड वाचलेले आहेत. आणि त्यातून तू मला काहीही प्रश्न विचारु शकतोस.” शिष्याने त्यांपैकी प्रत्येक खंडातून खूप अवघड असे प्रश्न त्यांना विचारले. स्वामीजींनी सगळ्या प्रश्नांची उत्तरे अचूक दिली. काही उत्तरे तर शब्दश : कोशाप्रमाणे होती.
आत्मविश्वास –
जुना धर्म म्हणत असे की, ज्याचा ईश्वरावर विश्वास नाही तो नास्तिक. पण नवा धर्म म्हणतो की, ज्याचा स्वत:वर विश्वास नाही तोच नास्तिक’ असे स्वामी विवेकानंद म्हणत. पुढे ते म्हणतात, ” कोणतेही कार्य करताना व्यक्तीच्या अंगी आत्मविश्वास असला पाहिजे. आत्मविश्वास आपणाला स्वप्रयत्नाने मिळवणे आवश्यक आहे. आत्मविश्वास प्रत्येक व्यक्तिमध्ये असतो. फक्त तो कमी जास्त प्रमाणात प्राप्त करण्यासाठी मनाची एकाग्रता, सकारात्मक दृष्टिकोन, मनाची पवित्रता, प्रचंड इच्छाशक्तीची आवश्यकता असते. “इ.स. १८८८ मध्ये जेव्हा स्वामीजींनी कोलकाता सोडले, तेव्हा त्यांच्या आयुष्यातली परिव्राजक पर्वाचा प्रारंभ झाला. जवळजवळ तीन वर्षे संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी देशाच्या अवस्थेचे निरीक्षण व चिंतन केले. भारतभ्रमण करताना काशीच्या वास्तव्यात एका छोटासा प्रसंग घडला. एवढा साधा प्रसंग असूनही त्याचा स्वामीजींच्या मनावर जो ठसा उमटला तो महत्वाचा आहे. दुर्गादेवीच्या मंदिरातून स्वामीजी परत चालले होते. एक जागा अशी आली की रस्त्याच्या एका बाजूला तळे तर दुसऱ्या बाजूला भिंत होती. स्वामीजी चालले असताना माकडांचा एक कळप त्यांच्या मागून आला. ती माकडे त्यांना पुढे जाऊ देईनात. माकडेच ती, तोंडाने आवाज करीत आणि त्यांच्या वस्त्रांशी लगट करीत, ती त्यांच्या मागे लागली. भराभरा पुढे जावे म्हणून स्वामीजी जोरात पावले टाकू लागले. तर माकडे अधिकच जवळ आली. शरीर ओरबाडू लागली, चावे घेतात की काय असे भय वाटू लागले. वाटू लागले की, आता आपण त्यांच्या कचाट्यातून सुटत नाही . तेवढ्यात त्यांच्या कानावर एका वृद्ध संन्याशाचे उंच स्वरातील शब्द पडले, “मागे वळा आणि त्या माकडांना तोंड द्या” हे ऐकताच स्वामीजी झटकन मागे वळले आणि हात उंचावून त्या माकडांवर ओरडले. त्यांचा तो मारण्याचा आविर्भाव पाहताच सारी माकडे एकदम मागे फिरली आणि स्वामीजी निर्वेधपणे आपल्या वाटेने पुढे चालू लागले. त्या संन्याशाला त्यांनी आदरपूर्वक धन्यवाद दिले. हा एक साधा प्रसंग, पण तो त्यांच्या अंतःकरणावर जणू कोरला गेला. पुढे न्यूयॉर्क येथे दिलेल्या एका व्याख्यानात हा अनुभव सांगून ते म्हणाले, “साऱ्या आयुष्यात उपयोगी पडेल असा हा धडा आहे. केवढंही संकट येऊ दया, त्याला निधडेपणाने सामोरे जा. Face the Brute , आपण संकटापासून पळ न काढता त्यांना धैर्याने टक्कर दिली तर ती माकडे जशी मागे फिरली तशी संकटेही आपल्याकडे पाठ फिरवितात. दुर्बल माणसे कधीही विजय प्राप्त करुन घेऊ शकत नाहीत. कोणत्याही प्रकारचे भय किंवा अज्ञान यांच्याशी आपण झगडा केला पाहिजे तरच या गोष्टी आपल्यापासून माघारी फिरतात.
चारित्र्य :
पैसा किंवा धन, यश किंवा विद्वता यामुळे नव्हे तर केवळ चारित्र्याच्या बळावर आपण पर्वतप्राय संकटावर मात करू शकतो.” स्वामी विवेकानंद म्हणत त्यांनी चारित्र्यसंपन्न समाज निर्माण करण्यावर भर दिला आहे. स्वामीजी म्हणतात की, चारित्र्यसंपन्न समाज निर्मितीसाठी आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदल करणे गरजेचे आहे. चारित्र्यसंपन्न समाज हा चिरकाल असणारी जीवनमूल्ये व संस्कृती विकसित करत असतो. परीक्षेच्या तयारीसाठी नरेंद्र एका स्वतंत्र, आवाज व गोंधळ नसलेल्या खोलीत अभ्यास करीत असत. या खोलीत अभ्यासाच्या मधल्या काळात विरंगुळा म्हणून गाणे म्हणत. या खोलीच्या समोरच्या घरात एक तरूण विधवा स्त्री राहत असे. नरेंद्र गात असताना नेहमी ती तिच्या खिडकीशी उभी राहून नरेंद्रच्या नकळत त्याचे गाणे ऐकत. एकदा ती रस्ता ओलांडून आली व नरेंद्रने अंधूक प्रकाशात तिला आपल्या दारासमोर उभी असल्याचे पाहिले. ती तरूण होती व स्वतः होऊन आली होती. त्याच्या नकळत तिने त्याला बऱ्याच वेळा पाहिले होते व त्यांच्याबद्दल तिच्या मनात प्रेम उत्पन्न झाले होते. त्या रात्रीही तिने गाताना ऐकले व तिच्या मनात प्रेम दाटून आले. नरेंद्र थक्क झाला. त्याने त्या मुलीला पूर्वी कधीच पाहिले नव्हते. तो त्वरित तिच्या पाया पडून उद्गारला, ” माते । तू का आलीस ? माझ्या आईसारखाच मी तुला मान देतो. ” दुसऱ्याच क्षणी नरेंद्र एकटाच तिथे होता. दुसऱ्या दिवशी नरेंद्रने ती खोली सोडली व पुन्हा कधीही तो त्या खोलीत दिसला नाही.
भारतप्रेम :
श्रीमंत, समृध्द आणि प्रगत अशा पाश्चात्य देशात स्वामीजींचे वास्तव्य झाले. त्यांच्या एका इंग्रज मित्राने प्रश्न केला, “भारताकडे परत जाताना तुम्हाला तुमच्या मायदेशाबद्दल काय वाटते ? ” स्वामीजी म्हणाले, ” मी इकडे आलो तेव्हा भारतावर माझे प्रेम होते, आता तिथली धूळही मला पवित्र वाटत आहे. तिथला नुसता वारा पावन वाटत आहे . माझ्या दृष्टिने भारत ही पुण्यभूमी आहे. ते एक तीर्थस्थान आहे. “भारताकडे निघताना मातृभूमीच्या अभिमानाने त्यांचे शरीर रोमांचित होऊन उठले होते. भारताचा किनारा जसजसा जवळ येत होता तसतसा तो भाव अधिक अधिक उत्कट होत चालला होता. अशा अवस्थेत असताना १५ जानेवारीच्या सकाळी सूर्योदयाच्या सुमारास समोर सिलोनचा (आताच्या श्रीलंकेचा) किनारा दिसू लागला, किनारा दृष्टिपथात येताच स्वामीजींच्या मनात अनेक भावनांची गर्दी झाली. स्वामीजींना अभिप्रेत असलेली देशभक्ती म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणे या अर्थाने मर्यादित नाही. ती व्यापक करुणाशीलतेपर्यंत पोचणारी आहे. मद्रासमधील एका व्याख्यानात श्रोतृसमुदायाला आवाहन करताना त्यांनी देशभक्त होण्यासाठी कशाची गरज आहे ते सांगितले. ते म्हणतात, “तुमच्या हृदयात तळमळ आहे का ? देवतांचे आणि ऋषींचे वंशज आज पशुतुल्य बनले आहेत हे बघून तुमच्या हृदयाला पीळ पडतो का ? कोट्यावधी लोक आज भुकेने तडफडत आहेत ते पाहून तुमच्या हृदयाला घरे पडतात का? आपला देश अज्ञानाच्या काळ्याकुट्ट ढगांनी भरून गेला आहे हे पाहून तुमचे हृदय पिळवटून जाते का? त्यामुळे तुम्ही अस्वस्थ झाला आहात का? तुमची झोप उडाली आहे का ? देशाच्या दुर्दशेच्या या चिंतेने आपला नावलौकिक आपली बायकामुले, आपली धनदौलत एवढेच नव्हे तर आपले स्वतःचे शरीर यांचा तुम्हाला विसर पडला आहे का? ” असे सारे प्रश्न विचारत स्वामीजींनी अखेर म्हटले, देशभक्त होण्याची ही पहिली पायरी आहे.” गरीबांची सेवा म्हणजेच ईश्वराचे पूजन होय. पद्दलित, उपेक्षित आणि समाजाकडून ज्यांच्यावर अन्याय झाला आहे ते लोक त्यांची दैवते होती. तंत्रज्ञानाच्या बळावर दारिद्रयाचे संपूर्ण उच्चाटन आणि शिक्षणाद्वारे अज्ञानाला जिंकून घेणे यामुळे देशाची उन्नती होईल. गरिबांना शिक्षण देण्यासाठी भारतातील मंदिरे ही आदर्श सांस्कृतिक केंद्रे बनली पाहिजेत असे स्वामीजींचे आग्रहाचे मत आहे.
करूणा :
एकदा परिभ्रमण करताना चालून चालून स्वामीजी थकून गेले होते. वाटेत एकजण चिलीम ओढत होता. स्वामीजी त्याच्याजवळ गेले आणि त्यांनी चिलीम मागितली ती व्यक्ती म्हणाली, “महाराज , आपल्याला माझी चिलीम देणार नाही. मी मेहतर आहे.” स्वामीजी लगेच पुढे गेले. चालत जात असताना त्यांच्या मनात विचार आला.” हे काय? आपण संन्यासी आहोत. जात, पात, कुळ, प्रतिष्ठा यांचा आपण त्याग केला आहे. असे असताना आपण परत जातीचा विचार करू लागलो!” स्वामीजी अस्वस्थ झाले. परत त्या मेहतराजवळ जाऊन त्यांनी त्याला समजावले. त्याच्याकडची चिलीम ओढून ते पुढे गेले. स्वामीजी म्हणतात, “ ही घटना मला एक फार मोठा धडा शिकवून गेली की कोणाबद्दलही आपल्या मनात तिरस्काराचा भाव उमटता कामा नये, सारी माणसे ही त्या प्रभूची लेकरे आहेत असा भाव सतत मनात जागा होतो आहे. “They have put their divinity in their beauty” या उद्गारात थोडीशीही घृणा नाही, कोणताही तिरस्काराचा भाव नाही. एखाद्या व्यक्तिच्या ललाटी किती लाजिरवाणे जीवन येते याविषयी केवळ एक अपार करुणा आहे. हे शब्द उच्चारत असताना स्वामीजींच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू येऊ लागले.
मातृभक्ती :
स्वामीजी अमेरिकेत होते. भारतातील वृत्तपत्रांमध्ये स्वामीजींच्या अमेरिकेतील कार्याबद्दल त्यांचा गौरव करणारा मजकूर होता. त्याची कात्रणे भारतातून आलेल्या टपालात होती. स्वामीजींबद्दल भारतात जो विरोधी प्रचार त्यांच्या हितशत्रूंनी वृत्तपत्रांतून चालविला होता त्या संदर्भातील काही कात्रणे होती. भारतातून आलेले सारे टपाल इझाबेलला मॅककिंडले यांनी स्वामीजींना पाठवून दिले होते. त्या कात्रणांविषयी न्यूयॉर्कहून स्वामीजींनी इझाबेलाला पाठविलेल्या पत्रात म्हटले होते, “माझ्याविषयी माझ्याच देशातील लोक काय म्हणतात याचीही मी फिकीर करीत नाही. पण एक गोष्ट मात्र आहे. माझी आई वृध्द आहे. साऱ्या आयुष्यभर तिने खूप सोसले आहे आणि असे सारे असूनही तिच्या साऱ्या आशा ज्याच्यावर केंद्रित झाल्या होत्या असा आपला मुलगा ईश्वराच्या आणि मानवाच्या सेवेसाठी देऊन टाकण्याच्या वेदनेचा सल तिने सहन केला. पण प्रतापचंद्र मुजुमदार कोलकात्यात सर्वत्र सांगत आहेत, त्याप्रमाणे दूर परदेशात कोठेतरी गेलेला हा आपला मुलगा तेथे पशूसारखे जीवन घालवीत आहे, अनितिमान झाला आहे हा असत्य वृत्तांत जर तिच्या कानावर गेला तर त्या धक्क्याने ती प्राण सोडेल. पण परमेश्वर दयाघन आहे. त्याच्या मुलांना कोणीही अपाय करू शकणार नाही. “स्वामीजींनी आपल्या आईची काळजी वाटत होती. त्यामागे मनाची फार मोठी वेदना उभी आहे .
(टीप: लोकसंधान या ई न्यूज द्वारे प्रकाशित होणारे लेख, कथा यांशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही.)

