भैरवनाथ सोसायटीच्या अध्यक्षपदी तुकाराम निगडे
उपाध्यक्षपदी बाबासाहेब गोळे यांची निवड
राहुल शिंदे
निरा, ता. १४ :
गुळुंचे (ता. पुरंदर) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन व व्हाइस चेअरमनपदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. यावेळी राबविण्यात आलेल्या निवडप्रक्रियेत तुकाराम निगडे यांची अध्यक्षपदी तर बाबासाहेब गोळे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी मंगळवार (ता. १३) रोजी दुपारी १ ते २.३० या वेळेत निवड प्रक्रिया पार पडली. माजी आमदार संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थापक उत्तम निगडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या या संस्थेत चेअरमन भानुदास निगडे व व्हाइस चेअरमन हरिश्चंद्र निगडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती.
निवडणूक अधिकारी म्हणून अमरिन बागवान यांनी काम पाहिले. सचिव सुभाष धुमाळ यांनी सहकार्य केले. यावेळी माजी अध्यक्ष व संचालक निर्मला निगडे, भानुदास निगडे, मल्हारी निगडे, जगदिश निगडे, विलास निगडे, नितीन निगडे, प्रतिभा ज्ञानदेव निगडे, शिवाजी रासकर, गणेश कर्णवर, अविनाश निगडे, हरिभाऊ निगडे, नितीन गायकवाड, स्वीकृत सदस्य लालासाहेब निगडे यांच्यासह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थ व सभासदांनी अभिनंदन केले.

