पुरंदरमध्ये भाजप सेनेच्या युतीने अनेक समीकरणे बदलणार ?
इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता.
राहुल शिंदे.
निरा, ता. १९ :
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुरंदर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपाकडून ‘स्वबळावर लढू’ चा नारा देण्यात आला होता. परंतु आता भाजप – शिवसेना (एकनाथ शिंदे गट) युतीच्या संकेतांमुळे दोन्ही मोठ्या पक्षातील तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार का ? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यातच युती झाल्यास जागा वाटप दोन्ही पक्षांत होणार असल्याने पक्षाकडून तिकीट मिळेल आणि स्वतंत्रपणे लढता येईल अशी आशा बाळगलेल्या अनेक इच्छुक उमेदवारांना युतीखातर पक्षादेश पाळावा लागणार आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून या स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून येण्यासाठी पक्षीय समीकरणे आखली जात आहेत. विशेष म्हणजे स्वबळाचे नारे आता हवेत विरत असून वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून युती होताना दिसत आहे. परंतु त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कामाला लागलेल्या अनेक उमेदवारांना पक्षाकडून तिकीट मिळणार नसल्याने अनेक उमेदवारांनी आजवर घेतलेले श्रम, केलेला खर्च वाया जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचे गराडे, वीर, बेलसर व नीरा – कोळविहिरे असे चार गट असून, पंचायत समितीचे गराडे, दिवे, वीर, भिवडी, बेलसर, माळशिरस, नीरा – शिवतक्रार व कोळविहिरे असे आठ गण आहेत. तालुक्यात एकूण १ लाख ८९ हजार ४०३ मतदार असून, यामध्ये ९५,२७१ पुरुष, ९४,१२९ महिला आणि ३ इतर मतदारांचा समावेश आहे. २३५ मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

राज्यात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने १९ महापालिकांमध्ये विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मिळालेल्या या यशाचा प्रभाव पुरंदर तालुक्यातही दिसून येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या बारा जागांसाठी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही पक्षांकडून मोठ्या संख्येने इच्छुक असल्याने दोन्ही पक्षांपुढे बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सासवड येथे दोन दिवस चाललेल्या भाजपच्या मुलाखतींना जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, जिल्हा सरचिटणीस गंगाराम जगदाळे, गिरीष जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेच्या संभाव्य जागांवर भाजपकडून आधीच सक्षम उमेदवारांची चाचपणी झालेली होती.
दरम्यान, पुण्यात झालेल्या भाजप – शिवसेना संयुक्त बैठकीत दोन्ही पक्षांनी जिल्हा परिषद निवडणूक एकत्रितपणे लढवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या बैठकीत जागावाटप, समन्वय व पुढील रणनितीवर चर्चा झाल्याने स्वतंत्र तयारी करणारे इच्छुक आता संभ्रमात सापडले आहेत.
प्रभागनिहाय रणनीती, कार्यकर्त्यांवरील जबाबदाऱ्या आणि उमेदवारांची धावपळ पाहता यंदाची जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक पुरंदर तालुक्यात अत्यंत चुरशीची आणि राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरणार असल्याचे दिसत आहे.
( दोन्ही इमेज AI निर्मित आहेत.)

