कऱ्हा – निरा संगमावर अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन
अश्रूंनी ओथंबला सोनगावचा संगम
राहुल शिंदे.
निरा, ता. ३० :
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अस्थींचे विधीवत विसर्जन करण्यात आले. सावडण्याच्या विधीवेळी परिसरात शोकमय बनला होता. पारंपरिक धार्मिक विधी पार पडल्यानंतर कुटुंबीय अस्थी विसर्जनासाठी सोनगावकडे रवाना झाले. येथील कऱ्हा – निरा संगमावर अजितदादांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
दिवंगत अजित पवार यांच्या अस्थींचे एकूण पाच कलश करण्यात आले असून, त्यापैकी एक कलश सोणगाव येथील कऱ्हा आणि निरा नद्यांच्या पवित्र संगमावर अत्यंत भावनिक वातावरणात विसर्जित करण्यात आला. वैदिक पद्धतीने पार पडलेल्या या विधीमध्ये उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
उर्वरित रक्षा विद्या प्रतिष्ठान परिसरात, बारामती शहरातील विविध ठिकाणी लावलेल्या झाडांजवळ तसेच दिवंगत अजित पवार यांच्या शेतामध्ये विसर्जित केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या कार्याशी आणि भूमीशी असलेली नाळ अखेरपर्यंत जपण्याचा हा भावनिक निर्णय असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ पुत्र पार्थ पवार यांच्या हस्ते अस्थिंचे विसर्जन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुनेत्रा पवार, पुत्र जय पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार राणा जगजीत सिंह पाटील, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, रणजीत पवार तसेच रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते.

