एकीकडे राष्ट्रवादीकडून भावनिक साद तर दुसरीकडे सेनेकडून हृदयद्रावक व्हिडिओ !
मतदारांना दोन्ही पक्षांकडून भावनिक आवाहन
श्रद्धा जोशी.
निरा, ता. ५:
निरा – कोळविहीरे जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत यावेळी प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांकडून मतदारांना घातली जात असणारी भावनिक साद हे यावेळीच्या निवडणुकीतील वेगळेपण दिसून येत आहे. सुरुवातीला विकासाच्या मुद्द्यांवर असणारा प्रचार आज जाहीर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी विकासदर्शक अधिक भावनाप्रधानता असा संयुक्त दिसून आला.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः उमेदवार निवडले असून हे उमेदवार निवडून देणे ही दादांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा आशयाची भावनिक साद राष्ट्रवादी पक्षाकडून मतदारांना घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुरंदर तालुक्याचे आमदार विजय शिवतारे यांचे डायलिसीस सुरु असताना त्यांचा काही क्षणांसाठी डोळा लागला आणि हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतारे यांच्याशी साधलेल्या भावनिक संवादाचा एआय निर्मित व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पुरंदरच्या जनतेच्या कल्याणासाठी विजय शिवतारे यांनी केलेला संघर्ष या व्हिडिओतून दिसत असून डायलिसीसचा प्रसंग निशब्द करून सोडणारा आहे.

पुरंदर तालुक्यातील निरा कोळविहीरे जिल्हा परिषद गट तसेच त्यांतर्गत दोन्ही गणात राजकीय घमासान सुरु आहे. तुल्यबळ उमेदवारांच्या लढती होत असल्याने या गटाकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.यापूर्वी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा हा गट मागील निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारत भगवा फडकवला होता. यावेळी भाजपा, भारतीय कॉग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. गटातून अपक्ष उमेदवार नसल्याने मतविभाजन होणार नसले तरी प्रत्येक उमेदवार आपल्या जीवाचे रान करताना दिसत आहेत. दरम्यान, शिवसेना व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून विकासाच्या मुद्द्यांवर प्रचाराला सुरुवात झाली होती. शिवसेनेने या गटात केलेल्या विकासकामांची मोठी यादीच वेळोवेळी जाहीर करत आपण कामाचे उमेदवार असल्याचे प्रमाणच मतदारांपुढे ठेवले आहे.
काल गुरुवार (ता. ०४) रोजी अजितदादांची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांचे आवाहन मतदारांना भावनिक करून गेले. आज शुक्रवार (ता. ०५) रोजी दादांचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या व्हिडीओत दादांनी मतदारांना केलेले आवाहन अधोरेखित करण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांची क्लिप शिवसेनेच्या उमेदवारांचा संघर्ष आणि विजयबापूंच्या कार्याला उजाळा देणारी ठरत आहे. सोशल मिडीयावर या भावनिक पोस्ट फिरत असून अनेकांच्या स्टेटसला देखील लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी या दोन्ही पक्षांची भावनिक साद लक्षवेधी ठरल्याचे दिसत आहे.

