निरा गटातून तेरा अर्ज वैध
राजकीय रणधुमाळी; अपक्ष आठ अर्ज वैध
श्रद्धा जोशी.
निरा, ता. २२ :
आज गुरुवार (ता. २२) रोजी वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा लांडगे यांनी प्रसिद्ध केली आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्ष, शिवसेना, प्रहार जनशक्ती पक्ष, भाजपा या प्रमुख पक्षांकडून रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रासह आठ अपक्ष नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. त्यामुळे निरा-शिवतक्रार गटातून एकूण तेरा उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. परंतु, यातील तीन उमेदवारांचे दोन अर्ज असल्याने प्रत्यक्षात दहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. तर अपक्ष म्हणून सहा उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. प्रत्यक्षात अर्ज मागे घेण्याच्या दिनांकानंतर लढतीचे अंतिम चित्र समोर येणार आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा महासंग्राम सध्या सुरु आहे. पुरंदर तालुक्यातील चार गट व आठ गणात जोरदार राजकीय रणधुमाळी सुरु आहे. नामनिर्देशनपत्र भरण्याच्या अंतिम दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडल्याचे पाहायला मिळाले.
पुरंदरमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपाचे मनोमिलन हा चर्चेचा विषय होता व आजही आहे. दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष एकत्र आल्याचे देखील पाहायला मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाची तालुक्यातील शक्ती वाढल्याचे दिसून आले. पक्षाच्या अधिकृत उमेदवारीसाठी डोळे लावून बसलेले इच्छुक उमेदवार आणि अनेक राजकीय खलबते घडत अंतिम दिवशी जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवारी या चर्चेचा विषय राहिल्या.
यावेळी अनेक पक्षांकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. निवडणुका जाहीर होताच अनेकांनी ‘आपलं फिक्स आहे !’ ची भूमिका सोशल मिडीयावर घेतली होती. काहींनी गट, गणात संवाद फेऱ्या देखील केल्या. परंतु, अखेरीला पक्षाने तिकीट डावलल्याने अनेकांची निराशा झाली.

